Uncategorized

शेतकरी फक्त ३ महिने काम करतात, उर्वरित ९ महिने पत्ते खेळतात अन् दारू पितात! भाजप खासदाराच्या विधानाने देशभरात संताप; अखेर मागितली माफी

Aditya chandramani Wane
द्वारा Aditya chandramani Wane रोजी November 12, 2026

Maharashtra Bulletin | महाराष्ट्र न्यूज

मध्य प्रदेश : शेतकरी वर्षातील केवळ तीन महिने काम करतात आणि उर्वरित नऊ महिने पत्ते खेळणे, गुटखा खाणे आणि दारू पिण्यात घालवतात, असे वादग्रस्त विधान करणारे भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या या विधानामुळे शेतकरी संघटना आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. वाढता विरोध लक्षात घेता अखेर खासदारांनी शेतकरी बांधवांची माफी मागितली आहे.

नेमकं काय म्हणाले भाजप खासदार?

मध्य प्रदेशातील रेवा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार जनार्दन मिश्रा हे मऊगंज जिल्ह्यातील गोवर्धन पूजा कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी आजचे शेतकरी वर्षातून केवळ तीन महिने मेहनत करतात, तर उर्वरित नऊ महिने पत्ते खेळणे, गुटखा खाणे आणि दारू पिण्यात वेळ घालवतात, अशा आशयाचे वक्तव्य केले.

त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला.

शेतकरी संघटना आक्रमक; माफीची मागणी

खासदारांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघासह विविध शेतकरी संघटनांनी आक्षेप घेतला. शेती ही केवळ तीन महिन्यांची नसून शेतकऱ्याला वर्षभर शेतात काम करावे लागते, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी मांडली.

पेरणी, निंदणी, फवारणी, सिंचन, कापणी, बाजारपेठेतील विक्री आणि पुढील हंगामाची तयारी अशा अनेक जबाबदाऱ्या शेतकरी पार पाडतो. याशिवाय अवकाळी पाऊस, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि वाढता उत्पादन खर्च यांचाही सामना करावा लागतो.

काही शेतकरी संघटनांनी खासदारांविरोधात पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अखेर खासदार जनार्दन मिश्रा यांनी मागितली माफी

वाढत्या टीकेनंतर खासदार जनार्दन मिश्रा यांनी व्हिडीओद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. आपण स्वतः शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांच्या अडचणींची पूर्ण जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या वक्तव्यामुळे शेतकरी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील, तर मनापासून माफी मागतो. कोणाचाही अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, त्यांच्या या माफीनंतरही शेतकऱ्यांच्या कष्टांचा आणि लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांचा मुद्दा चर्चेत कायम आहे.

शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव कधी होणार?

देशाचा अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता शेतात राबतो. कधी पावसाची चिंता, तर कधी पिकाला योग्य भाव मिळण्याची प्रतीक्षा, अशा अनेक संकटांतून त्याला जावे लागते.

त्यामुळे शेतकऱ्यांविषयी वक्तव्य करताना लोकप्रतिनिधींनी त्यांच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Maharashtra Bulletin चा सवाल : वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवायला नको का?


लेखक : आदित्य चंद्रमणी वणे
संपादक | Maharashtra Bulletin Newspaper Portal

टीप : खासदारांचे विधान आणि त्यानंतरची माफी विविध वृत्तमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांवर आधारित आहे.